मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रालयात दाखल झाले. परंतु यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असताना राज ठाकरे यांनी मात्र मास्कशिवाय मंत्रालयात आल्याने चर्चा रंगली आहे.


दरम्यान मास्क न घालण्यासंदर्भात राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.



कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य आहे. मंत्रालयात आलेल्या बहुतांश नेत्यांनी मास्क वापरलेलं होतं. जेव्हा  एखादा नेता सरकारने सांगितलेले नियम पाळावे असं सांगत असतो, त्यावेळी त्याने स्वत: देखील त्याचं पालन करणं गरजेचं असतं. परंतु राज ठाकरे यांनीच मास्क न वापरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याचवेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मात्र मास्कमध्ये दिसले.


कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे. तसंच सार्वजनिक मास्क न वापरल्यास एक हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयात आल्याने, कोरोना व्हायरससारख्या साथीमध्ये नियम आणि अटी सामान्यांसाठी आणि व्हीआयपींसाठी वेगळ्या आहेत का असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

बैठकीला कोणाची हजेरी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, रासपचे नेते महादेव जानकर, शेकापचे नेते जयंत पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई इत्यादी नेते उपस्थित आहेत.