संबंधित वॉर्डमध्ये चार मृतदेह असल्याचे व्हायरल झालेल्या चित्रफितीत दिसून येत आहे. व्हिडीओ सायन रुग्णालयातीलच असल्याच्या वृत्ताला अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांच्याकडून पुष्टी देखील मिळाली आहे. काल नितेश राणे यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या शेजारी मृतदेह ठेवलेत. हे भयानक आहे. कुठल्या प्रकारचे प्रशासन आहे, हे खूप लज्जास्पद असल्याचं राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
सायन रुग्णालयाचं स्पष्टीकरण
यावर सायन रुग्णालयाचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सायन हॉस्पिटलचे डीन प्रमोद इंगळेंनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सायन हॉस्पिटल येथील आहे. मात्र, नेमका कोणत्या दिवसाचा माहित नाही. मृत कोरोना रुग्णाचे नातेवाईक बॉडी क्लेम करायला लवकर येत नाहीत. येणारे नवे रुग्ण थांबवताही येत नाहीत. यामुळे काही अंतरावर बॉडी ठेवली गेली असे त्यांनी म्हटले आहे.
डॉक्टर इंगळे यांनी सांगितलं की, ज्या वार्डात मृतदेह ठेवले आहेत. तिथं काही पेशंटवर उपचार सुरु आहेत कारण तिथल्या भिंतीला लागून ऑक्सिजन लाईन त्या वार्डातील बेडच्या जवळ उपलद्ध आहे. पेशंटला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. जर त्यांना तिथून हलवलं तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शवगृहात क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह ठेवलेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
यावर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासंबंधी दिरंगाई केली जाते. नातेवाईक जर येत असतील तर मृतदेह तिथेच प्लास्टिक रॅप करुन देण्याचा विचार प्रशासनानं केला असावा. प्रशासनाकडून यासंदर्भात योग्य ते आदेश दिले जातील, असं त्यांनी सांगितलं.