कोल्हापूर :  मल्चिंग पेपरच्या वापरामुळं तणांच्या बंदोबस्तासोबत पाण्याची बचत होते. यामुळं अनेक शेतकरी मल्चिंगचा वापर करतात. मात्र मल्चिंग पेपर अंथरणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते, हीच कसरत कमी करण्यासाठी कोल्हापुरातल्या जाधव बंधूंनी केवळ सहा हजार रुपये खर्च करुन एका यंत्राची निर्मिती केलीय


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमधील संदीप जाधव आणि सुदर्शन जाधव बंधू घरच्या सात एकरातल्या जमिनीत टोमॅटो, काकडी, कलिंगड, वांगी अशी पिकं घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून यासाठी ते तणांचं नियंत्रण आणि पाण्याच्या बचतीसाठी मल्चिंग पेपरच्या वापर करत आहेत. मात्र दरवर्षी मल्चिंग पेपर अंथरणी करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने, यावर उपाय म्हणून घरच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करुन या भावंडांनी मल्चिंग पेपर अंथरणी यंत्र तयार केलं आहे.

वास्तविक, पारंपरिक पद्धतीनं मल्चिंग पेपर अंथरणीसाठी 10 ते 12 मजूर, एकरभरासाठी 1 ते 2 दिवसाचा वेळ आणि 10 ते 12 हजार रुपये मजूरी द्यावी लागते, पण जाधव बंधूंचं हे यंत्र केवळ 2 माणसांच्या मदतीनं, अवघ्या एका तासात एकरभरात मल्चिंग पेपर अंथरतं. यासाठी केवळ तीन लिटर डिझेलचा खर्च करावा लागतो. हे यंत्र बनवण्यासाठी जाधव बंधुंना केवळ 6 हजार रुपये खर्च आलाय.

जवळपास 150 ते 200 किलो वजनाचं हे यंत्र ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोडता येतं. तसेच यंत्राच्या वरच्या बाजूला मल्चिंग पेपरचा रोल लावण्यासाठी जागा करण्यात आली आहे. यंत्राच्या दोनही बाजूस चाकं आहेत, ही दोन्ही चाकं मल्चिंग पेपर दाबण्याचं काम करतात. याच्या बाहेरील दोन बाजूला फाळके आहेत, याच्या मदतीनं माती मल्चिंग पेपरवर लोटली जाते. तर एका रॉडच्या मदतीनं हा मल्चिंग पेपर बेडवर पक्का अंथरला जातो.

जाधव बंधूंनी याआधी मल्चिंग पेपरला होल पाडण्याचं यंत्र तयार केलं होतं, आणि आता मल्चिंग पेपर अंथरणी यंत्र बनवलंय. त्यामुळे जाधव बंधूंनी तयार केलेली ही यंत्रे शेतकऱ्यांच्या वापरात आली, तर त्यांचं जीवन थोडं सुकर होईल; यात शंका नाही.

व्हिडिओ पाहा