मुंबई : तब्बल पाच तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली आहे. पनवेलहून कुर्ल्याला जाणाऱ्या गाडीचा प्रवास सीएसटीपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे आता अप मार्गावरही वाहतूक सुरु झाली आहे. जीटीबी नगरजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
ऐन गर्दीच्या वेळी मुंबईत हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. जीटीबी नगर डाऊन मार्गावर मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरल्याने सीएसटी ते कुर्ला वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी 4.35 ला ही घटना घडली.
प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते पनवेल मेन लाईनवरुन वाहतुक सुरू ठेवण्यात आली. तर सीएसटी ते अंधेरी वाहतूकही सुरु आहे. प्रवाशांना मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय प्रवाशांसाठी वडाळा, कुर्ला डेपोतून बेस्टच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या.
वाहतूक सुरु करण्यात आली असली तरीही लोकलचं वेळापत्रक मात्र कोलमडल्याचं चित्र आहे. कारण कुर्ला, वाशी, वडाळा या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मध्य रेल्वेने वाशीहून ठाण्यासाठी अतिरिक्त लोकल सोडल्या आहेत.
गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी ट्रान्सहार्बर मार्गावरुन ठाण्याहून प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे. पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येत आहेत.
वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर सकाळी साडे नऊ वाजता सीएसटीच्या दिशेने पहिली लोकल धावली.
पुन्हा घातपाताचा कट?
मालगाडीचा हा अपघात घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रेल्वे रुळ कापल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. रेल्वे रुळ कापलेला असल्यामुळेच मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरले. यापूर्वीही अनेकदा मुंबई आणि परिसरात रेल्वे रुळावर लोखंडी रॉड आणून ठेवल्याचं आढळून आलं होतं.