कोल्हापूर : राज्यातील शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाची नासाडी करुन आंदोलनाला हिंसक वळण लावू नये, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांचा संप मिटेपर्यंत स्वाभिमानीचा दूध संघ बंद राहिल. राज्यातील इतर दूध संघांनी संघ बंद ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.

बळीराजा का खवळला याचा विचार करायला पाहिजे. मान्सूनच्या तोंडावर शेतकरी आतून पेटलेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वर्षांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही त्यावर विचार झालेला नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. गरज नसेल तेव्हाही आयात केली जाते. त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात, असंही राजू शेट्टींनी सांगितलं.



राज्यभरातील शेतकरी संपावर

राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं.

पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.

  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.


संबंधित बातमी :

शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव : मुख्यमंत्री


नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी, रघुनाथदादांचा राजू शेट्टींवर घणाघात


शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार : खोत


शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री


शेतकरी संप : साताऱ्यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले