मुंबई : गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातून 84 हजार 369 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. धक्कादायक म्हणजे या महिलांचं काय झालं? त्या कुठे आहेत? या महिलांपैकी कितींचा पोलिसांनी शोध घेतला हे कुणालाही माहिती नाही. सर्वात आधी एबीपी माझानं महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला आणि मुलं गायब झाल्याचं तपशीलवार दाखवून दिलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयानं या आकडेवारीच्या घटनांची तपशीलवार विवेचन करण्याचे आदेश दिले आहेत. नेमक्या कोणत्या भागांमधून महिला आणि मुले गायब होत आहेत महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण आहे, याबाबतची माहिती विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत.


राज्यात 2016 साली 24 हजार 937, 2017 साली 28 हजार 133 तर 2018 साली 31 हजार 299 मराठी महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. त्या कुठे आहेत ? काय स्थितीत आहेत? त्यातल्या किती पोलिसांनी शोधल्या याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत सर्वात आधी एबीपी माझानं महाराष्ट्रात देशात सर्वाधिक महिला आणि मुलं गायब होण्याचे प्रमाण आहे हे तपशीलवार दाखवून दिलं होतं.

लातूरसह राज्यातल्या 14 जिल्ह्यात सुरु असलेली महिला आणि मुलींची तस्करी एबीपी माझानं उघड केल्यावर खळबळ उडाली. पोलिसांनी माझानं मांडलेली आकडेवारी कशी खोटी आहे असं सांगून आपले हात झटकले होते. खरंतर लातूरमधून होत असलेल्या मुली महिलांच्या तस्करीचा नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थीं यांनी अंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेख केला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो मुली महिलांची तस्करी सुरू आहे. या मुलींची 80 हजारापासून 3 लाखापर्यंत विक्री सुरू असल्याची देखील माहिती आहे.


माझाच्या टीमनं लातुरातल्या 10 जणांच्या टोळीनं 11 वर्षाच्या मुलीच्या केलेल्या विक्रीच्या प्रकरणाचा खोलवर तपास केला. लातूरतून तीनशेहून अधिक महिला मुली गायब असल्याचं दाखवून दिलं. हरवलेल्यांचा शोध घेण्याऐवजी लातूरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी फक्त दोन वर्षांची आकडेवारी सादर केली. विधीमंडळाला संपूर्ण माहिती न देता अर्धवट माहिती दिली. आघाडी सरकारच्या काळात हर्षवर्धन पाटील महिला आणि बालविकास मंत्री असताना महिला आणि मुलींची तस्करी होत असलेल्या 14 जिल्ह्याची यादी बनवण्यात आली होती.

देशात 27 लाख महिला तस्करी रॅकेटमध्ये अडकल्या आहेत. दरवर्षी 30 हजार महिला यात ढकलल्या जात आहेत. महिला तस्करीत कोलकाता पहिल्या क्रमांकाचं, मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं शहर आणि महाराष्ट्र मुली महिलांमुळे गायब होण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.