नवी दिल्ली : महाराष्ट्रातली सत्तास्थापना असो, गल्ली ते दिल्ली राजकारण असो..राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचं नाव त्यात सतत केंद्रस्थानी असतं. पण आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयातल्या एका सुनावणीतही शरद पवारांच्या नावावरुन थोडावेळ गदारोळ झाला.

ही सुनावणी होती मराठा आरक्षणाची. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला आहे त्याला विरोध करत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आपली बाजू मांडताना त्यांनी यात पवारांनाही ओढलं. एका बड्या नेत्याची मुलगी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असललेल्या आंदोलनाला भेट देते, त्यातून राजकीय पक्षपातीपणा कसा दिसतो हे वकिलांना सांगायचं होतं. पुढे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची नावंही घेतली. त्यावर विरुद्ध बाजूच्या वकिलांनी आक्षेप घेतला. शिवाय न्यायमूर्तींनीही विषय कोर्टात आल्यावर तो राजकीय राहत नाही, त्यामुळे राजकीय नेत्यांची नावं कारण नसताना घेऊ नका असं खडसावलं. अशी नावं घेतल्यास पुन्हा युक्तीवादाला उभं राहू देणार नाही अशीही तंबी त्यांनी सदावर्ते यांना दिली.

Maratha Reservation | मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार | ABP Majha



दरम्यान आज सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला. पुढची सुनावणी 17 मार्च रोजी होणार आहे. या निर्णयामुळे मेडिकल प्रवेशांमध्ये फटका बसलेल्या काही विद्यार्थ्यांनीही या प्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. पण आता मूळ याचिकेवर 17 मार्च रोजीच सुनावणी होणार असल्यानं आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्याची मागणी मान्य न झाल्यानं तूर्तास तरी मराठा आरक्षणाला दिलासा मिळाला आहे.

सरकारी वकिल अॅड. सचिन पाटील यावर  म्हणाले, कायद्याच्या चौकटीत केस ऐकणार असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले आहे.  कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घ्यायचे नाही. येथून पुढे नाव घेतलं तरी तुम्हाला कोणताही युक्तीवाद करू दिला जाणार नाही, अस स्पष्ठ शब्दात कोर्टाने सुनावले आहे.