जालना : एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं म्हणतात. म्हणूनच तिकडे लडाखमध्ये बसून मुलांसाठी काम करणारा फुनसुख वांगडू आपल्याला मोठा वाटतो. कारण त्याने आपल्या दैनंदिन जगण्यातले प्रश्न विज्ञानाच्या साह्याने सोडवण्याचा प्रयत्न त्याने केला. असंच छोटं पाऊल उचललं ते जालन्याजवळच्या बोररांजणी गावात राहणाऱ्या सचिन काटे या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाने. उत्तर शोधलं की जगणं बदलतं हा मंत्र देणारा नागराज मंजुळे एबीपी माझासह पोचला या गावात आणि त्याने काटे सरांची ही गोष्ट पडद्यावर आणली.


जालन्यापासून 20 किलोमीटर अंतरावर बोररांजणी हे गाव आहे. या गावात एक प्राथमिक शाळा. आता तिथे सहावीपर्यंत वर्ग आहेत. एव्हाना शाळेला सुट्टी आहे. शिवाय उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मुलं, पालक दुपारच्या वेळात फारसे घराबाहेर पडत नाहीत. पण शुक्रवारी मात्र ऐन दुपारी ही शाळा फुलली होती. पटांगणात मंडप टाकण्यात आला होता. कारण, गावात नागराज मंजुळे दाखल होणार होता. दुपारी चारच्या आसपास नागराज शाळेत आला. सत्कार समारंभ झाल्यानंतर त्याने गाठला तो थेट या लहानग्यांचा वर्ग. पहिली ते चौथीची मुलं शाळेत आली होती. आणि एरवी मुलगा आणि त्याचं ठेवलेलं दप्तर असं चित्र दिसण्याऐवजी तिथे ठेवलेले टॅब लकाकत होते. कारण ही शाळा होती डिचिटल शाळा. इथे शिकवणाऱ्या काटे सरांनी मुलांच्या खांद्यावर असणारं दप्तराचं ओझ कमी केलं आणि ती सगळी पुस्तकं आणली ती टॅबममध्ये. ही छोटी मुलं टॅब शिताफीने वापरतात आणि मराठी, विज्ञान, गणित हे सगळे विषय यातल्या अॅपद्वारे शिकतात.


नागराजने वर्गाचा ताबा घेतल्यानंतर ही सिस्टिम समजून घेतली. इथे फळाही नेहमीचा काळा नाही आहे. तर इथे वापरला जातो डिजिटल फळा. नागराजने ते प्रात्यक्षिकही करुन बघितलं आणि तो आवाक झाला. मुलांशी तर त्याने संवाद साधलाच. पण शिक्षकांनाही बोलतं केलं.

आपल्या सर्वांना माहीती आहेच, त्याचा सध्या कोण होणार करोडपती हा शो टीव्हीवर दिसतो आहे. त्याच पद्धतीने त्यांने मुलांनाही प्रश्न विचारले. त्यांनाही बोलतं केलं. मुलांनीही ही सगळी गंमत पुरती एन्जॉय केली. अर्थात या सगळ्याला लोकांपर्यंत पोचवणाऱ्या एबीपी माझाचेही सर्वांनी आभार मानले.

बोररांजणीसारख्या छोट्या गावात सुरु केलेलं हे डिजिटल शाळेचं मॉडेल महाराष्ट्रातल्या सर्वंच शाळांत वापरलं जावं असा आग्रह यावेळी उपस्थित सर्वांनी धरला.