अकोला : राज्यातील राष्ट्रवादीचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोलाही यावेळी आंबेडकरांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं. राज्यात औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लीम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत पराभव झाल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकरांनी स्वत: सोलापूर आणि अकोला या दोन जागी निवडणूक लढवली. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही याबाबत अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. दरम्यान, आंबेडकरांनी विधानसभेसाठी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न केला. सध्या प्रमुख कार्यकर्त्यांची राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. पुढच्या काळात राजू शेट्टींनी कुणासोबत जावं ते लवकर ठरवावं, असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, राज ठाकरेंना विधानसभेत मोठी संधी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. विधानसभेत युतीमुळे शिवसेनेची पोकळी राज ठाकरेंना किंगमेकर बनवू शकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या मनसे सोबत कोणत्याही संभाव्य आघाडीची शक्यता त्यांनी फेटाळली.