सांगली : सांगली जिल्ह्यातील उद्योग व शेतीच्या पाण्यावर जलसंपदा विभागाने आजपासून उपसाबंदी लागू केली आहे. केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी देत बंदी काळात उपसा केल्यास संबंधिताचा पाणी परवाना, विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच उपसा सामग्री जप्त करण्यात येणार आहे. बिगर सिंचन वापरकर्त्यांनी प्रदूषित, सांडपाणी, औद्योगिक वापराचे पाणी थेट नदीत सोडू नयेत, असे आदेशही जलसंपदा विभागाने दिले आहेत.


सांगली जिल्ह्यात यंदा तापमानाने गाठलेली उच्चांकी आणि यामुळे नदी पात्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणवर झालेले बाष्पीभवन आणि धरणातील कमी झालेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने हा आदेश काढला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये ही उपसाबंदी लागू करण्यात आली असून 21 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास उपसाबंदी कायमस्वरुपी ठेवण्यात येणार आहे.


कृष्णा पाणलोट क्षेत्रातील धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. कोयना धरणात केवळ 10.15 टीएमसी आणि चांदोली धरणात केवळ 2.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उन्हाची तीव्रता मोठी आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान दहा वर्षांत पहिल्यांदाच तब्बल 42 ते 43 अंशांपर्यंत गेले आहे. एकीकडे सातत्याने उपसा सुरू असतानाच पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. परिणामी कोयना, चांदोली, धोम, कण्हेर या धरणांतील पाणी वेगाने कमी झाले.


मे महिन्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी ऊस, केळी, सोयाबीन, द्राक्षे, भाजीपाला व अन्य पिकांसाठी पाण्याचा प्रचंड उपसा केला. तसेच दुष्काळी भागासाठी टेंभू, म्हैसाळ व ताकारीतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 25 टीएमसीवर आला.


कोयना धरणातील पाण्याने मे महिन्याच्या अखेरीस तळ गाठला आहे. सध्या धरणात 15.47 टीएमसी पाणी आहे. यातील उपयुक्‍त पाणी केवळ 10.15 टीएमसी आहे. चांदोलीची क्षमता 34.40 आहे. आता उपयुक्‍त पाणीसाठा केवळ 2.30 टीएमसी आहे.


पुढील आठ दिवसांत या धरणांतील पाणी मृतसंचयाच्या खाली जाणार आहे. परिणामी उपसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पिण्यासाठीच पाणी उपसा करण्यास परवानगी आहे. त्यामुळे या पाणी योजनांची वीज सुरु ठेवण्यात येणार आहे. परंतु सिंचन योजनांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे.


उपसाबंदीचे वेळापत्रक


- 4 जून ते 9 जूनपर्यंत कृष्णा नदीवर वाळवा तालुक्यातील बहे बंधारा ते राजापूर बंधार्‍यापर्यंतच्या दोन्ही बाजूला शेतीसाठी पाणी उपसाबंदी केली आहे.
- 10 जून ते 15 जून सिंचन योजना सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
- 16 जून ते 21 या कालावधीत पुन्हा उपसाबंदी असेल. त्यानंतरही पाऊस पडला नाहीतर सिंचनाचे पाणी कायमचे बंद केले जाणार आहे.