पंढरपूर : विठूच्या पंढरीत निराधार आणि मनोरुग्ण वृद्धांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलीय. हेच लक्षात घेता पंढरीतल्या तरुणांनी एकत्र येत, या निराधार वृद्धांना मानसिक-आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतलाय. तरुणांच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

अनेकजण आपल्या कुटुंबातील कुणी वृद्ध त्रासदायक वाटला किंवा मनोरुग्ण असला, तर त्यांना पंढरपुरात आणून सोडून  देतात, असे अनेकदा समोर आले आहे. असे निराधा भिक्षा मागून पंढरीत आपल्या आयुष्याची गाडी हाकत असतात. यात्रेनंतर तर अशा निराधारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेचं वाळवंट हे या निराधारांचे आश्रयस्थान बनते आणि उरलेला काळ ते याच ठिकाणी घालवत असतात. यातील बहुतांश मंडळी चांगल्या घरातील असूनही केवळ कुटुंबाच्या त्रासामुळे निराधार बनलेली असतात. देशात सगळ्यात जास्त भिकारी हे सोलापूर जिल्ह्यात असल्याची आकडेवारी काही वर्षांपूर्वी आलेल्या एका अहवालातून समोर आले होते.



उद्योग धंद्यात काम करणारे आणि शेतीत राबणाऱ्या या तरुणांनी एकत्र येत अशा निराधारांसाठी नियमितपणे काहीतरी करायचे ठरवले आणि यातून ‘राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्थे’ची सुरुवात झाली. सोशल मीडियावर गुंग असणाऱ्या या तरुणाईला एक उद्देश मिळाला आणि मोबाईलवर अखंडपणे चालणारे हात आता निराधारांच्या सेवेसाठी राबू लागले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून या तरुणांनी शहरातील अशा निराधारांची ठिकाणे शोधली आणि त्यांना संत तनपुरे मठात आणण्याचे काम सुरु केले. या निराधारांचे केस आणि नखे कापण्यात आली. त्यांना आंघोळ घालून नवीन कपडे देण्यात आले. यावेळी अनेक निराधारांना वैद्यकीय मदतीची गरज दिसून आल्यावर त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. यानंतर त्यांच्यासोबत या तरुणांनी भोजन करीत त्यांना एक दिवसाचा मायेचा कौटुंबिक अनुभव मिळवून दिला.



विशेष म्हणजे, याच ठिकाणी एका बाजूला काँग्रेस पक्षाचा मेळावा मोठ्या गाजावाजात सुरु असताना ही तरुणाई मात्र दिवसभर कोणालाही न सांगता या निराधारांच्या सेवेत रमून गेली होती. आता महिन्यात एकदा तरी या निराधारांसोबत दिवस घालवण्याचा यांनी निश्चय केला असून त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील काय करता येईल यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जाणार असल्याचे सचिन लोंढे या तरुणाने सांगितले. तर शेतीत निसर्ग साथ देत नसला तरी या तणावातून देखील अशा निराधारांच्या सेवेतून समाधान मिळत असल्याचे धनाजी गोरे यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील बंडू ढोलेसारख्या शेतकरी कुटुंबातील एकाला भाऊबंदकीने वडिलांच्या मृत्यूनंतर घरातून हाकलून देत त्याची सगळी संपत्ती जमीनजुमला लाटला. वडिलांची श्रद्धा याच पांडुरंगावर असल्याने बंडूने देखील 1972 साली देवावर हवाला ठेवून निराधार झाल्यावर पंढरपूर गाठले आणि तेव्हापासून तोही आता इथलाच बनला आहे. मिळेल तिथे भीक मागून दिवस सारताना त्याला या तरुणाईतच आपले मायबाप दिसले. निराधारांना आता या तरुणाईने मायेचा हात दिल्याने त्यांनाही आता आधार वाटू लागला आहे.