औरंगाबाद : औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असणाऱ्या घाटी रुग्णालयात चक्क औषधांचा साठाच शिल्लक नाही. त्यामुळे ऑपरेशन असेल तर बाहेरुनच गोळ्या-औषधं घेऊन या असा अजब सल्ला रुग्णालय प्रशासनाकडून दिला जात आहे.
रुग्णालयाकडे मोठी थकबाकी असल्यामुळे औषध पुरवठा करणाऱ्या हाफकिन कंपनीने औषध साठा थांबवला आहे. मात्र औषधांचा पुरवठा थांबेपर्यंत प्रशासन काय करत होतं, असा संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांचे नातलग करत आहेत.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 100 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया रोज केल्या जातात. मात्र गेल्या महिन्यांपासून रुग्णालयाकडे सलाईन वगळता एकही औषधी उपलब्ध नाही. याशिवाय सिटीस्कॅन, एमआरआय स्कॅन यासारख्या अनेक मशिनरीही आवश्यक त्या क्रीमच्या अभावामुळे बंद आहेत. त्यामुळे ऑपरेशन करायचं असेल तर औषधं बाहेरुन खरेदी करावी लागत आहेत.
शासकीय रुग्णालयात साधं खोकल्याचं औषधही उपलब्ध नाही. पेनकिलर, अॅलर्जी, त्वचेच्या आजारासाठीचीही औषधे घाटीमध्ये नाहीत. अॅलर्जीसाठीची सेट्राझिन, डिक्लोफेनॅक गोळी, किईझो सोप, केटोडर्म क्रीम या त्वचेच्या आजारासंबंधीची, आम्लपित्तची रॅनटॅक गोळी, ऑग्युमेंटिनसारखी कानासाठीचे ड्रॉप अशी काही औषधे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरुन आणण्यास सांगितले जाते. शहरात कुत्रा चावल्याच्या 25 प्रकरण दररोज घाटी रुग्णालयात येतात, त्यासाठी लागणारी एकही रेबीज लस घाटीकडे नाही.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी तातडीची बैठक बोलावली होती. लोकप्रतिनिधींसह शासकीय रुग्णालयाचे डीन आणि इतर कर्मचारीही उपस्थित होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील काहीही तोडगा निघू शकलेला नाही.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातूनही रुग्ण येतात. घाटी रुग्णालय चालवण्यासाठी वर्षाकाठी 126 कोटी वार्षिक गरज असते. शासनाने त्यातील केवळ 96 मंजूर झाले, पण दिले केवळ 48 कोटी रुपये. त्यात औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पुरवठा बंद केल्याने शासकीय रुग्णालय व्हेंटिलेटरवर आहे.
औषधं संपली, औरंगाबादचं घाटी रुग्णालय व्हेंटिलेटवर
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
01 Oct 2018 01:25 PM (IST)
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातूनही रुग्ण येतात. त्यामुळे औषधंच संपल्याने रुग्ण आणि कुटुंबीयांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -