मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत 'व्यापमं'सारखा घोटाळा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे. सरकारने सामूहिक कॉपीला उत्तेजन देण्यासाठी जाणूनबुजून 'मोबाईल क्रमांक आधारित' बैठक क्रमांक पद्धत अवलंबल्याचा आरोप सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषदेत केला.

17 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना दिलेल्या परीक्षा प्रवेशपत्रातील बैठक क्रमांक हे उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे देण्यात आले आहेत. अशाप्रकारे परीक्षांसाठी बैठक क्रमांक देण्याची पद्धत आयोगाद्वारे 2017-18 सालात घेण्यात आलेल्या बऱ्याच परीक्षांसाठी वापरण्यात आली होती, असं तांबेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना फॉर्म भरण्यापूर्वी आपली प्रोफाइल तयार करावी लागते. यामध्ये मोबाईल नंबरही भरावा लागतो. 2017-18 पासून परीक्षार्थींच्या मोबाईल नंबरचे अखेरचे डिजिट ग्राह्य धरुन त्यांना सीट नंबर दिला जातो.

उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी अर्ज करण्यापूर्वी जाणीवपूर्वक एका पाठोपाठ येणारे भ्रमणध्वनी क्रमांक खरेदी केले आणि आपल्याला सोयीच्या असलेल्या उमेदवाराशी मिळती जुळती केल्याचा आरोप सत्यजीत तांबेंनी केला आहे. यामुळे मास कॉपी होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे.

सरकारच्या हलगर्जीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे, ग्रामीण भागातील गरीब, मागासवर्गीय आणि आदिवासी उमेदवार स्पर्धेच्या बाहेर फेकले गेल्याची भीतीही तांबेंनी व्यक्त केली आहे.

सदर बैठक व्यवस्थेमुळे होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने बैठक व्यवस्था निश्चित करताना आधार क्रमांक, जन्म दिनांक यासारख्या इतर पर्यायी निकषांचा वापर करावा, अशी विनंतीही तांबेंनी केली आहे.