बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांची कन्या म्हणजेच बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करत आहेत, तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून नशीब आजमावण्याची शक्यता आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
सुप्रिया सुळे या गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणाऱ्या पवार कुटुंबातील एकमेव सदस्य होत्या. पवार कुटुंबीयांनी निवडणूक लढवली, तर फक्त त्या-त्या मतदारसंघातीलच नाही, तर राष्ट्रवादीच्या इतर जागा जिंकण्याची शक्यताही वाढेल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अंदाज आहे. तसंच राष्ट्रीय राजकारणातही राष्ट्रवादीचा वरचष्मा राहील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
शरद पवारांनी 2009 साली सोलापुरातील माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याआधी, जवळपास दोन दशकं राखलेली बारामतीची जागा त्यांनी लेकीसाठी सोडली होती. सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा बारामतीतून खासदार आहेत. त्यामुळे पवारांनी पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. मात्र पुण्यातील जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
पुण्यात भाजप मेळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागांवर निवडणूक लढणार आहोत. मागच्या वेळी 42 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 43 जागा जिंकू आणि ही 43 वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन 45' मांडलं होतं. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असं अमित शाह म्हणाले होते.
शरद पवार जर माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, तर भाजप त्यांचा पराभव करेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला होता. आमची संघटनात्मक रचना अशी आहे, की आम्ही शरद पवारांचा पराभव करु शकू. पण ते बारामतीत उभे राहिले, तर आम्हाला कठीण आहे, असं पाटील म्हणाले होते.
दुसरीकडे, अजित पवार ज्या शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत, तिथे गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील मोठ्या मताधिक्याने जिंकून येत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाना आपली प्रतिष्ठा पणाला लावताना डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.