मुंबई: युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. कुणाल राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. आज जाहिर झालेल्या निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली आहेत. कुणाल यांचे जवळचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली.


मुलाखतीनंतर घोषणा
कुणाल राऊत, शिवराज मोरे आणि शरण बसवराज पाटील तीनही उमेदवारांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मुलांखत घेतली जाणार आहे. त्यानंतर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा केली जाणार आहे.


या निवडणुकीसाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली होती. कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली आहेत. तर शिवराज मोरे यांना 3,80,367, शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली.


कुणाल राऊत अल्प परिचय
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी  झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एन.एस. यु.आय.चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha