अकोला :


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातील खापरखेडच्या नितीन सावरकरचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता. होणारी बायको 'सुंदर' असावी असा अट्टाहास असलेल्या नितीनची इच्छा सुंदर बायको मिळणार असल्यानं पूर्णही झाली होती. खापरखेडच्या नितीनचा बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा तालूक्यातील अलमपूरच्या एका तरूणीशी विवाह निश्चित झाला होता. तिनं नितीनसोबत भावी संसाराची स्वप्नंही रंगवणं सुरू केलं होतं. त्या दिवशी कपडे खरेदीचा मुहूर्त होता. एरव्ही तिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या नितीनला तिची नजर बरोबर नसल्याचा साक्षात्कार एकाएकी झाला. अन त्यानं चक्क लग्नालाच नकार दिला. ऐनवेळी नितीनच्या या पवित्र्यानं वधुपक्षाकडे खळबळ उडाली. त्याला समजावण्याचे, मनवण्याचे प्रयत्नही झालेत. नितीन मात्र मुलीच्या डोळ्यात समस्या असल्याचं सांगत लग्नाला नकार देत होता. शेवटी कपडे घेण्यासाठी आलेला नितीन अन त्याच्यासोबतच्या चार-पाच नातेवाईकांना चर्चेसाठी प्रेमाने अलमपूरला नेण्यात आले. अन पुढच्या 'खास' पाहूणचारानं नितीनच रडायला लागला. अगदी सासरी निघालेल्या वधुसारखा.... 


नवरदेवाला मारहाण 


लग्नाला नकार देणाऱ्या नितीनला समजवण्यासाठी अलमपूरला वधूच्या घरी बैठक बसली. बैठकीच्या चर्चा होता-होता सायंकाळ झाली. चर्चेच्या दिवाणखान्यात मग 'खास' प्रसंग उभा राहिला. आपल्या गावाच्या लेकीला ऐनवेळी लग्नाला नकार देणाऱ्या नितीनभाऊंच्या पाहूणचाराच्या दिमतीला काही तरूण आले. बैठकीतील लाईट बंद झाले अन बैठकीतील चर्चेऐवजी धपाधपचे आवाज सुरू झाले. अगदी कालपर्यंत भावी जावई म्हणून मान-सन्मान होत असलेल्या नितीनचा खास पाहूणचार  झाला. अन या पाहुणचारानो विव्हळत असलेला नितीन चक्क रडायला लागला. काहीवेळानंतर लाईट पुन्हा लागले. पुन्हा प्रेमानं चर्चा सुरू झाली. अन ब्रेकनंतर पिक्चर क्लायमॅक्सकडे जातांना परत हिरोचा व्हिलन झालेल्या नितीनची 'यथेच्छ' धुलाई झाली. अखेर काही ज्येष्ठांच्या मध्यस्थीने नितीन अन सोबतच्या चौघांना बाहेर त्यांच्या चारचाकीपर्यंत नेण्यात आलं. यावेळी परत एकदा नितीनसोबत त्याच्यासोबतच्यांना प्रसाद मिळाला. अन सरतेशेवटी या सर्वांची तेथून सुटका झाली. 


नवरदेव नितीन ग्रामपंचायत सदस्य 


या संपूर्ण प्रकरणात पाहुणचाराचा लाभार्थी नवरदेव नितीन सावरकर हा तेल्हारा तालूक्यातील खापरखेड या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे. खापरखेडच्या या नवरदेवाच्या फजितीची सध्या संपुर्ण तालुक्यात चांगलीच चर्चा आहे. नितीन हा पदवीधर आहे. या घटनेनंतर सध्या नितीनसह कुटुबियांनी या संपूर्ण प्रकरणावर चुप्पी साधली आहे. 



ही घटना 6 एप्रिलची आहे. तब्बल पंधरा दिवसांनंतर या घटनेचा व्हिडीओ सध्या अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, एव्हढा मोठा राडा झाल्यानंतर या प्रकरणी दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही पोलीस कारवाई झालेली नाही. सुटका होण्याआधी नवरदेवाकडून साखरपुड्यात खर्च झालेली रक्कम वसूल करण्यात आल्याची चर्चा दोन्ही गावांत आहे. 
     
अलिकडे साखरपुडा झाल्यावर नवरदेवाकडून ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे ऐनवेळी लग्नाला नकार देणाऱ्या प्रवृत्तींना अलमपुरच्या गावकऱ्यांनी शिकवलेला धडा अशांना नवा संदेश देणारा आहे. अशा मारहाणीचं समर्थन करणं शक्य नसलं तरी अशा घटना टाळण्यासाठी समाजानच जागृत अन चौकस असणं गरजेचं आहे.