पंढरपूर : कोरोनामुळे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आणि यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीनंतरचे भीषण चित्र आता धडकी भरवणारे समोर येऊ लागल्याने निवडणूक चांगलीच अंगलट आली म्हणायची वेळ आता जनतेवर आली आहे. गावेच्या गावे आजारी पडू लागली असून हॉस्पिटलमध्ये रुग्ण ठेवायला जागा नाही. यातच रोज शेकडोंच्या संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. ना रेमडेसिवीर, ना ऑक्सिजन, ना उपचारासाठी बेड अशा अवस्थेत जनतेसमोर कोरोनाचा मृत्यू आ वासून उभा आहे. यात ज्यांना उपचार मिळत नाहीत अशांची प्रेतामागून प्रेते स्मशानभूमीत अंतिमसंस्कारासाठी वाट पाहत थांबलेली आणि मिळेल त्या ठिकाणी सर्वत्र जळत्या चिता असे भीषण चित्र सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे.
        
अशी स्थिती राज्यात सर्वत्र असली तरी त्याची भीषणता आणि कहर पंढरपूर मंगळवेढा येथे जास्त पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सभा झालेल्या भोसे, बोराळे सारख्या अनेक गावात सध्या घरटी रुग्ण सापडू लागले असून तपासणीच नसल्याने रुग्णांची मर्यादित संख्या समोर येत आहे. पण गावागावात फिरून माहिती घेतल्यावर परिस्थिती किती बिकट बनत चाललीय याचा अंदाज येतो. मंगळवेढा तालुक्यात 25 गावात सध्या कोरोनाचा कहर सुरु असून इतर गावातही रुग्णांचा आकडा फुगू लागला आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक सभेत आपल्याच कार्यकर्त्यांचे मास्क बाबत अतिशय कटू शब्दात कान टोचले असले तरी त्यांच्या आणि फडणवीस यांच्या सभेच्या गर्दीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे आमदार संजयामामा शिंदे असतील किंवा आमदार अमोल मिटकरी असतील भाजपचे प्रचार प्रमुख बाळा भेगडे असतील ही मंडळी आता कोरोनाग्रस्त झाली आहेत. शेकडोच्या संख्येने लहान मोठे कार्यकर्तेही आता कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र, या निवडणुकीमुळे कोरोनाचे अमाप पीक पंढरपूर आणि मंगळवेढ्यात आल्याने गोरगरीब नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. 


किमान आतातरी उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत ज्यांच्यामुळे सभांना अलोट गर्दी झाली त्यांनी किमान आता याची जबाबदारी स्वीकारत पंढरपूर मंगळवेढ्यासाठी जादाचे रेमडेसिवीर, ऑक्सिजन, डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ याचे नियोजन करून देणे आवश्यक आहे. याचसोबत लसीबाबत या भागावर होत असलेला अन्याय तातडीने दूर करून योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा वेळेत केल्यास ही महामारी रोखाने शक्य होणार आहे. अन्यथा या निवडणुकीतून किती बळी गेले हे मोजनेही अवघड बनणार आहे. सध्या पंढरपूर स्मशानात रोज सरासरी 8 ते 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय तर मंगळवेढा येथेही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. विधानसभेच्या 288 पैकी एका आमदारासाठी दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणुकीतून काय कमावले पेक्षा किती गमावले याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे लागेल.