बीड : संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगावात दसरा मेळावा घेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडाहून भव्य रॅली काढली आणि रस्त्यामध्ये हजारोंच्या संख्येने समर्थक या रॅलीमध्ये सहभागी झाले. सावरगावात पंकजा मुंडेंनी समर्थकांना संबोधित केलं. त्याआधी प्रीतम मुंडे यांचंही भाषण झालं.

प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात होताच एक असा किस्सा झाला, ज्याने एकच हशा पिकला. प्रीतम मुंडे भाषणाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांची नावं घेत होत्या. प्रीतम मुंडेंनी त्यांची आई, सासू आणि नंतर नवऱ्याचंही नाव घेतलं. पण नवऱ्याचं नाव घेताच उपस्थित समर्थकांनी मोठा आवाज केला.

समर्थकांकडे पाहत प्रीतम मुंडे म्हणाल्या, ''मला वाटलं फक्त मोठ्या भावोजींचाच (पंकजा मुंडे यांचे पती) फॅन फॉलोईंग आहे. जानकर साहेब, तुम्ही आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही,'' असं म्हणताच एकच हशा पिकला. प्रीतम मुंडेंनी त्यांचे पती गौरव खाडे यांना उभं राहून हात करण्याची विनंती केली. महादेव जानकरांनीही गौरव खाडे यांनी उचलून घेतलं.

अमित पालवे हे राजकारणापासून दूर आहेत. पण ते आमच्या रासपमध्ये आहेत, असं महादेव जानकर अनेकदा मिश्कीलपणे म्हणत असतात. मुंडे कुटुंबीयांचे आणि जानकरांचे जिव्हाळ्याचे संबंध असून ते मुंडे भगिनींचे मानलेले भाऊ आहेत. दरवर्षी दसरा मेळाव्याला महादेव जानकरही उपस्थित असतात.

प्रीतम मुंडे यांचं संपूर्ण भाषण