नागपूर : 62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरात भीम बांधवांचा जनसागर उसळला आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याला ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात.
दीक्षाभूमीवर आजही सकाळपासून मोठी गर्दी उसळली आहे. जय भीमच्या घोषणा दिल्या जात आहेत. दीक्षा भूमीवरच्या भव्य बौद्ध स्तुपामधील बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी कलशाचं दर्शन घेऊन त्यासमोर नतमस्तक होत आहेत.
दरम्यान, आज संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसात 10 कोटींच्या पुस्तकांची विक्री
वाचन संस्कृती संपत चालली आहे, नवी पिढी वाचनाकडे लक्ष देत नाही असे आपण नेहमीच म्हणतो. मात्र, नेमकं उलट चित्र नागपूरच्या दीक्षाभूमीवर आल्यावर पाहायला मिळतं. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर विविध विषयांवरील पुस्तकांच्या खरेदी विक्रीचे शेकडो स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आलेला प्रत्येक माणूस दीक्षाभूमीवरुन एक तरी पुस्तक घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विजयादशमीच्या काळात अवघ्या दोन दिवसांत दीक्षाभूमीवरुन 10 कोटी रुपयांची पुस्तक विक्री होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे असं समजलं जातं की एक-दोन दिवसांच्या कालावधीत एकाच ठिकाणातून एवढ्या पुस्तकांची विक्री इतरत्र कुठेच होत नाही.
विजयादशमीच्या काळात दीक्षाभूमीच्या अनेक स्टॉल्सवर बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्या विचारांवर आधारित पुस्तकांशिवाय राज्यघटनेचे विविध पैलू समजावून सांगणारे ग्रंथ, दलित चळवळीशी संबंधित ग्रंथ, जगातील विविध ठिकाणच्या सामाजिक धार्मिक क्रांतीवर आधारलेले ग्रंथ या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकाच ठिकाणी ज्ञानाचा असा खजिना उपलब्ध होत असल्यामुळे युवा वर्ग, नोकरदार वर्ग दीक्षाभूमीवर येऊन पुस्तक खरेदी आवर्जून करताना दिसतो.