नागपूर : रस्तावर बेवारसपणे अस्वच्छ अवस्थेत बसलेले, फिरणारे मनोरुग्ण पाहिल्यावर अनेकजण रस्ता बदलतात, तुच्छ नजरेने त्यांच्याकडे पाहतात. मात्र नागपुरातील योगेश मालखरे या मनोरुग्णांचा आधारवड ठरला आहे. माणुसकीचं खरंखुरं दर्शन घडवणारं असं कार्य योगेश करत आहे.

‘स्माईल प्लस सोशल फाऊंडेशन’ या संस्थेच्या मार्फत योगेश मालखरे नागपुरात मनोरुग्णांना नवं आयुष्य सुरु करुन देतो. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेली, त्याची टीमही त्याला सहकार्य करते.

कुणी व्यक्ती अस्वच्छ अवस्थेत रस्त्याच्या बाजूला दिसली, तर तिला अंघोळ घालून स्वच्छ करणं, मग मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणं किंवा नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या पर्यंत पोहोचवणं, अन् कुणीच नसेल तर आश्रमात दाखल करणं, असा प्रयत्न योगेश मालखरे आणि त्याच्या टीमचा असतो.

‘स्माईल प्लस’ने 12 लोकांना राहता येईल, असे राज्यातील पहिले ‘माणुसकीचे घर’ही उभारले आहे. या माणुसकीच्या घरात केअरटेकर म्हणून काम पाहणारा चेतन नाथानीचीही एक वेगळी संघर्षगाथा आहे.

चेतन नाथानी मूळचा पुण्यातला. भाऊ आणि वहिनीच्या भांडणाला कंटाळून घरातून निघाला आणि असाच पुलाखाली जाऊन राहिला. अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये बसून राहिला. त्याच्यावर ‘स्माईल प्लस’ची नजर पडली आणि चेतनचं आयुष्य नव्याने फुललं. चेतन आता मनोरुग्णांचा केअरटेकर म्हणून माणुसकीच्या घरात काम पाहतो.

कुणी अस्वच्छ माणूस दिसल्यावर तुच्छतेने पाहणारा आपला भोवताल असताना, योगेश मालखरे आणि स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचं काम म्हणजे माणुसकीच्या व्यापक व्याख्येचं दुसरं रुप आहे.