गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. ग्यारपत्ती भागात सुरु झालेल्या चकमकीत हा जवान शहीद झाला असून अजूनही ही चकमक सुरुच आहे. काही पोलिसांना नक्षल्यांनी ओलीस ठेवलं आहे.


शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात एक जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले होते. यानंतर ग्यारपत्ती भागात पोलिसांनी नक्षलवादीविरोधी अभियान सुरु केलं होतं. रात्री सीआरपीएफचे आणि सी 60 दलाचे जवान शोध मोहीम राबवून परतत असताना नक्षलवाद्यांनी घातपातानं जवानांवर हल्ला चढवला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. मात्र या चकमकीत एका जवानाला आपला जीव गमावावा लागला आहे.

दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांना घेरलं असून अजूनही पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचं कळतं आहे. पोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.