Maharashtra Politics: यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim) लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपला दावा केला असतानाच, आता या जागेसाठी महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच होतानाचे चित्र आहे.


अशातच आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मोहिनी नाईक यांच्या उमेदवारीबाबत भाष्य करताना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सोबतच त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास आपण संपूर्ण ताकदीने त्यांना मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. झिरवाळ हे आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. 


मी स्वतः वैयक्तिकरित्या त्यांना मदत करेल 


देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात आता नेमका कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अंतिम यादी जाहीर झल्यावरच त्याबाबतचा शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच आता महायुतीकडून राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांची यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim) लोकसभा मतदारसंघातून वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी देखील त्यांच्या उमेदवारी पाठबळ दिले आहे.


त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, आज सकाळपासून मी या मतदार संघाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली आहे की, आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्यात यावी. त्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु मोहिनी नाईक यांना जर का उमेदवारी देण्यात आली तर मी स्वतः वैयक्तिकरित्या  त्यांना मदत करण्याचे पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे देखील झिरवाळ  म्हणाले. 


आदिवासी समाजाची प्रचंड ताकद


यवतमाळ वाशिम मतदारसंघात आदिवासी समाजाची प्रचंड ताकद आहे. माझ्या आमदारकीच्या तीन टर्म मध्ये राज्यभरात समाजासाठी जे काही चांगले प्रयत्न केले, त्याला बऱ्याच ठिकाणी यश आले आहे. त्याचा परिणाम म्हणून मी यवतमाळ वाशिम मतदार संघातही मदत करू शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत काय होतं हे लवकरच कळेल. मात्र आपण सर्व जनमत आणि कार्यकर्त्यांची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करू.  अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळते, हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.


कोण आहेत मोहिनी नाईक?


मोहिनी नाईक यांना नाईक घराण्याचा राजकीय वारसा लाभला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या त्या नातसून आहेत. तर माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या त्या सून आहेत. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या त्या पत्नी आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या