Maharashtra Politics: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात आता नेमका कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अंतिम यादी जाहीर झल्यावरच त्याबाबतचा शिक्कामोर्तब होणार आहे.
यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपला दावा केला असतानाच, आता या जागेसाठी महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.
पंतप्रधानाच्या भेटीनंतर अनेक चर्चाना उधाण
साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर 'मै मेरी झांशी नहीं दूंगी' या ऐतिहासिक घोषणेचा जयघोष करत शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे संकेत दिले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांच्या नावाची याच मतदारसंघातून वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नुकत्याच यवतमाळच्या महिला मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ येथे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत असून अनेक चर्चाना उधाण आले आहे. सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आपला संपर्क देखील वाढविला आहे.
बंजारा समाजाची महिला उमेदवार
जानेवारी महिन्यात महायुतीचा जिल्ह्यात पहिला मेळावा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात बंजारा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे मेळाव्यातील त्यांचे सूचक विधान आता यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या महिला उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे देखील बोलले जात आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येत असून भाजप 4 मतदारसंघात भाजप तर दोन मतदारसंघ महायुतीचे घटक आहे. त्यामुळे उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर असावा, अशी मागणीही भाजपकडून वरीष्ठकडे केली आहे.
कोण आहेत मोहिनी नाईक?
मोहिनी नाईक यांना नाईक घराण्याचा राजकीय वारसा लाभला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या त्या नातसून आहेत. तर माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या त्या सून आहेत. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या त्या पत्नी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या