यवतमाळ : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मागील दीड वर्षात अनेक संशोधन करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचार करतांना डॉक्टरांना पीपीई किट आवश्यक असते. त्याच पीपीई किटला पर्याय म्हणून यवतमाळच्या आकाश गड्डमवार या तरुण संशोधकाने वातानुकूलित मास्क तयार केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे त्याचे उपकरण डॉक्टर,नर्स, फ्रंटलाईन वर्कर्ससाठी फार उपयोगी ठरणार आहे .


कोविड 19 आजार वातावरणातील विषाणू हात, नाक आणि डोळ्याला संसर्ग होऊन मानवी शरीरात प्रवेश करतात. कोविडबाधितांच्या उपचाराकरिता डॉक्टर्स, नर्स, आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालावी लागते. या पीपीई किटमुळे आतमध्ये हवा शिरत नसल्याने संपूर्ण कपडे घामाने ओले चिंब होतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच त्यामुळे प्रचंड थकवा जाणवतो. यावर दिलासा देणारे अतिशय सुरक्षित मास्क यवतमाळच्या संशोधकाने तयार केला आहे आणि याच मास्कचा वापर केला तर पीपीई किटला सुट्टी मिळण्याची शक्यता आहे .


आकाश गड्डमवार या तरुण संशोधकाने "डोरा" या वातानुकूलित मास्कची निर्मिती केली आहे. हा मास्क परिधान केल्यावर कोरोना विषाणूचा मानवी शरीरात शिरकाव होण्यास प्रतिबंध होतो आणि सोबतच मास्कमध्ये वातानुकुलित व्यवस्था असल्याने शुद्ध ऑक्सिजनसह श्वास घेता येतो. कोरोनाचा कुठलाही स्ट्रेन आला तरी हा त्यावर डोरा प्रोटेक्ट करेल असेही आकाश गड्डमवार सांगतो.


या डोरा मास्कद्वारे विषाणू विरहीत स्वच्छ श्वास घेता येतो. आवश्यकतेनुसार थंड किंवा गरम ऑक्सिजनची सुविधा यात आहे. शिवाय वातावरणातील ऑक्सिजन घेऊन त्याचे चार स्तरीय अत्याधुनिक फिल्टर्स द्वारे शुद्धीकरण करण्यात येत असल्याने हे उपकरण अतिशय सुरक्षित आहे. या उपकरणाला इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे आठ तास शुद्ध ऑक्सिजन घेता येतो. ऑक्सिजन शुद्धता 95 टक्के इतकी असून उपकरणाचे वजन केवळ 350 ग्रॅम आहे. हे उपकरण कमरेला सहज बांधता येते. डोरा मास्कचा दर्शनी भाग पारदर्शक असल्याने डोळ्याने सभोवतालचे दृश्य स्पष्ट दिसते, चष्मा घालण्यास सोईचे, सहज बोलता येते, बोलताना वाफ येत नाही आणि दुसऱ्याचे ऐकू देखील येते. या उपकरणाचा मास्क बदलता येतो आणि मास्क हा वोशेबल आणि अनब्रेकेबल सुध्दा आहे तसेच तो आणि माफक किमतीत तो उपलब्ध आहे असे आकाश सांगतो.




या उपकरणामुळे पीपीइ किटवर होणारी सुमारे 300 ते 500 रुपयांच्या खर्चाची बचत होणार आहे. "डोरा" या मास्कचा खरा उपयोग डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स किंवा ज्या ठिकाणी नागरिक जास्त गर्दी करतात जसे की बस कंडक्टर यांना होऊ शकतो. जी व्यक्ती जास्त उंचीवरच्या टेकड्यावर काम करते जम्मू काश्मीर किंवा लेह लडाख सारख्या उंच बर्फाळ ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणविते त्या ठिकाणी सुद्धा या 'डोरा मास्क' योग्य प्रकारे कार्य करतो. यात 16 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान नियंत्रण करता येते किंवा आवश्यकते नुसार अडजेस्ट करता येते तसेच हा डोरा मास्क डस्टफ्रुफ सुध्दा आहे. वाळवंटी प्रदेशात सुध्दा हा मास्क घालून नीट काम करता येते डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यांची काम करण्याची क्षमता वाढते असा दावा संशोधक आकाश गड्डमवार करतोय.


जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येतात असे लोकप्रतिनिधी ,कॅश काउंटर रोखपाल, दुकानदार, व्यापारी, बस कंडक्टर, वाहतूक पोलीस, कटिंग दुकानातील कर्मचारी यांच्यासाठी हे उपकरण फार सुरक्षित असल्याचा दावा आकाशने केला आहे. डेल्टा प्लस या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे डोरा मास्क उपयोगी ठरेल असा विश्वास आकाश गड्डमवार याने व्यक्त केला आहे.


आकाशला लहान असतांना डोरेमोन हे कार्टून खूप आवडायचे. त्यावरूनच त्याने डोरा या वातानुकूलित मास्कला 'डोरा' हे नाव ठेवले केवळ 20 दिवसांत त्याने चौथ्या प्रयत्नात हा डोरा मास्क निर्मित केला .आकाशची आई वनिताबाई यांचे आकाशने संशोधन क्षेत्रात कार्य करावे असे स्वप्न होते. त्याच दिवंगत आईच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आता आकाश धडपडतोय.


विशेष म्हणजे आकाशला स्टार्ट अप इंडियाचा एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा सोलर एनर्जी बॅटरी सिस्टम बाबतचा दोन कोटीचा पहिला पुरस्कार सुध्दा 2019 साली जाहीर झाला आहे . 


तसा आकाश गड्डमवार हा मूळचा यवतमाळचा. एम.टेक. (मेकॅनिकल)  पदवी 2015 साली पूर्ण झाल्यावर त्याने बंगलूरु येथील भारतीय विज्ञान संस्था येथे रीसर्चर म्हणून संशोधनात्मक काम केले.


PGIMER पदव्युत्तर वैद्यकीय आणि संशोधन संस्था चंडीगड सोबत तो संलग्न असून सन 2017 साली पुणे येथे आकाशने गायरोड्राईव्हज मशिनरीज नावाने कंपनी स्थापन केली. सुरुवातीला बेअरिंग, मोटर विषयक वस्तू उत्पादने आणि त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात कमी किंमतीचे पोर्टेबल व्हेंटीलेटर, डोरा मास्क, पी.एफ.एफ. उत्पादनांची निर्मिती करून या तरुण संशोधकाने उंच आकाशात झेप घेण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे .त्याच्या या प्रवासात त्याचे मित्र ईशान धर, मुकुंद पात्रिकर ,सागर गड्डमवार यांच्यासहपदव्युत्तर वैद्यकीय आणि संशोधन संस्था चंडीगड येथील डॉक्टर राजीव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभल्याचे आकाश सांगतोय. 


महत्वाच्या बातम्या :