यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर बेड आणि उपचार न मिळाल्याने कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली आहे. बबन गुल्हाने असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी बाहेर आज दुपारी दारव्हा येथील बबन गुल्हाने यांना रुग्णवाहिकेमध्ये घेऊन त्यांचे नातलग आले होते. मात्र, दुपारी दीड वाजता त्यांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना रुग्णवाहिकेमध्येच बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून थांबण्यास सांगण्यात आले. त्यामुळे प्रकृती चिंताजनक असतानाही बबन गुल्हाने यांना ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतच बेड नसल्याने वेटिंगवर राहण्यास सांगितले गेले. या दरम्यान बबन गुल्हाने यांच्या नातलगांनी बरेचदा बेड उपलब्ध करून देण्याची आणि पुढील योग्य उपचार करण्याची विनंती केली. मात्र, त्यांची हाक ऐकली गेली नाही आणि वेळीच उपचार न मिळाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे मृत व्यक्तीच्या नातलगांनी आरोप केला आहे.
 
65 वर्षीय बबन गुल्हाने यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची कोरोना टेस्ट केली होती. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट आज भेटणार होता. त्यांना कोरोना सारखी लक्षण होती, असे त्यांच्या नातलगांनी सांगितले. दारव्हा येथून त्यांना आज दुपारी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयमध्ये आणले. मात्र, येथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांचा रुग्णवाहिकेमध्ये फिव्हर क्लीनिकच्या समोर मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता मिळाली नाही. तसेच त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. तर आरएमओ चेतन जणबांधे यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 577 बेड असून आता 620 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण महाविद्यालयात उपचार घेत आहेत.


अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार


कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय काल उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.