मुंबई : देश कोरोनाग्रस्त झाला तरी चालेल पण भाजपला ममता बॅनर्जींचा पराभव करायचा आहे. त्यांना ममतांचा पराभव करायचा आहे पण कोरोनाचा नाही अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. आपला देश निवडणूक ग्रस्त झाला असल्याचंही ते म्हणाले. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "गुजरातमधील भरूच, बडोदा आणि सुरतमध्ये कोरोनाची सर्वात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमीत मृतदेह 48 तास वेटिंगवर आहेत. महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात अनेक आमदारांना, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण ज्या प्रकारे महाराष्ट्राला त्रास द्यायचा प्रयत्न सुरु आहे, हे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना?"


देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि मंत्री म्हणून अमित शाह यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे असं सांगत खासदार संजय राऊत म्हणाले की, "या काळात सगळ्यांनी देश म्हणून एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक राज्याने एकमेकांना मदत केली पाहिजे."


उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहारमध्ये कोराना कसा नियंत्रणात आणला असं भाजप सांगत होतं पण आज तिकडे फक्त मुडदे दिसत आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. या भाजप शासित राज्यात कोरोनाचे आकडे लपवले गेले, पण महाराष्ट्रात आकडे लपवण्याचा प्रकार कधीही घडला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 तास काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.  


खासदार संजय राऊत म्हणाले की, "जगातल्या इतर देशांनी कोरोनावर विजय मिळवला. पण आपण कुठेतरी कमी पडलो. याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना जास्त माहित असेल कारण त्यांनी सर्वात जास्त देश फिरले आहेत. देशातील कोरोना विरोधातल्या या लढ्याचे सेनापती नरेंद्र मोदी आहेत. सेनापतीनं तंबू ठोकून लक्ष ठेवायचं असतं."
 
लॉकडाऊनमध्ये लोकंच ऐकत नाही त्याला काय करायचं? लोकांना सुद्धा कळायला पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या :