औरंगाबाद : यंदा मराठीसह 5 भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार असल्याची माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली आहे. अभियांत्रिकीसोबत पॉलिटेक्निक अभ्यासक्रम सुद्धा मातृभाषेत उपलब्ध करुन देण्याची उच्च व तंत्रशिक्षण विभागाची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. या दीक्षांत समारोहात 81736 स्नातकांना पदवी, पदविका, प्रमाणपत्रे तसेच पीएचडी प्रदान करण्यात आल्या. यावर्षी देशात मराठी, तामिळ, बंगालीसह 5 भारतीय भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी मुख्य दीक्षांत भाषणात दिली. त्यादृष्टीने 14 महाविद्यालयांनी तयारी केली असल्याच त्यांनी सांगितलं.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काही दिवसांपूर्वीच अभियांत्रिकीचा व इतर तंत्रशिक्षणासंबंधी अभ्यासक्रम मातृभाषामध्ये सुरु करण्याबाबतचा विचार सुरु असल्याचं सांगितलं होतं. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेतून उच्च शिक्षणाचा पुरस्कार करणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषामध्ये उच्च शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातायेत. त्याच धर्तीवर आता अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी व संशोधकांच्या नवसृजन व कल्पकतेला वाव देणारे असल्याचे अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यपाल, डॉ. अनिल सहस्रबुद्धेसह, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आदींची उपस्थिती होती
याच मुद्यावर पुढे बोलताना,अभियांत्रिकी शिक्षण मराठी भाषेतून देण्याच्या भूमिकेचे स्वागत करताना राज्यात पॉलिटेक्निकमधून देखील मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. गेल्या दिड वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन, मराठी भाषा दिन साजरा करणे, शिवस्वराज्य दिन साजरा करणे आदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉ. आंबेडकर यांच्या नावाला साजेसे कर्तृत्व केले पाहिजे अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेप्रमाणे एनसीसी देखील सर्व महाविद्यालयांमध्ये सुरु करावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :