दावोस :  दावोस येथे सुरु असलेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद महाराष्ट्रासाठी विशेष अशी ठरली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्र सरकारला राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यात यश आलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्राकडून 80 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. रिन्यू पावर या कंपनीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारकडून अक्षय ऊर्जा, ईव्ही बॅटरी आणि ग्रीन हायड्रोजन प्लांटच्या निर्मितीकरीता सहमती झाली आहे. 


दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक मंडळाने भाग घेतला आहे. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त पर्यावरणपूरक उद्योग आणि गुंतवणूक आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अक्षय ऊर्जा, ईव्ही बॅटरी आणि ग्रीन हायड्रोजन प्लांटच्या निर्मितीकरीता राज्यात 80 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 


 






या व्यतिरिक्त फार्मा आणि मेडिकल उपकरणे, आयटी, डाटा सेंटर्स, टेक्सटाइल्स, पेपर ॲंड पल्प, स्टील, फूड प्रोसेसिंग, पॅकेजिंगसारख्या क्षेत्रातून महाराष्ट्रात गुंतवणूक होणार आहे. यामुळे राज्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. 


दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन
राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दावोसमध्ये एक प्रातिनिधीक मंडळ गेलं असून त्यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उर्जा मंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक आशिष कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जगभरातून राज्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.


जगभरातील गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारकडून पॅव्हेलियन उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी जगभरातून गुंतवणूक आकर्षित करणे यासाठी प्रयत्न केला जात आहे.