यवतमाळ : कापूस उत्पादक शेतकऱ्याला 1 जून पूर्वी कापसाचे बियाणे विक्री करू नये, असं परिपत्रक राज्य सरकारने काढल्याने  शेतकरी यवतमाळ जिल्ह्याला लागून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये जाऊन बियाणे खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू आहे.  


यवतमाळ जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात 5 लाख हेक्टरवर कापूस लागवड करण्याची शक्यता आहे. दरवषी शेतकरी 15 मे पासून बियाणे खरेदीला सुरुवात करतात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा 80 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर कापसाची लागवड करतात. शेतकरी एकदा बाजारात आला की खत आणि बियाणे सोबतच विकत घेतात. त्यामुळे त्याला शेतीचे कामं बाजूला ठेऊन वारंवार बाजारात येण्याची गरज भासत आहे.


जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याकडे मुबलक पाण्याची सोय आहे असे शेतकरी मान्सून पूर्व कापसाची लागवड करत होते आणि भरपूर उत्पादनही घेत होते. मात्र, अलीकडे गुलाबी बोंड अळीने कहरच केला आहे. बोंड अळीची सायकल तोडायची असेल तर विक्रेत्याने कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना 1 जून पूर्वी देऊ नये असे परिपत्रक काढण्यात आलं. त्यामुळे कापसाची किंमत वाढण्याच्या भीती पोटी शेतकरी बाहेरच्या राज्यातून बियाणे खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकरी बियाण्याची आधी ही धावपळ करत आहे. कापसाची लागवड उशिरा केली तर  बोण्ड अळी येणार नाही. अशी हमी सरकार देणार काय असा प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे. 


यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून आहे. इथले  शेतकरी कापसाच्या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात. अल्पभूधारक शेतकरी तर कापसाशिवाय दुसऱ्या पिकाची लागवडच करत नाही. हे पीक त्याच्यासाठी हमखास उत्पन्न देणार आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्ष पासून कापसाचीच लागवड ते करत आहे. मात्र  सध्या बाजार पेठेत कापसाचे बियाणे मिळत नाही. त्यामुळे या  शेतकऱ्याची बियाण्याची भटकंती सुरू आहे. त्यात त्याने परप्रांतातून बियाणे घेतले तर शेतकरी फसवले जाण्याचीही शक्यता आहे.


यवतमाळ जिल्ह्यात 20 हजारच्या घरात बॅग कापसाच्या बियाण्याच्या विकल्या जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन वेळेवर करता येत नाही. शेतकऱ्यांची सुद्धा मे महिन्याच्या मध्यंतरी पासून  कापसाची मागणी आहे. या शेतकऱ्यांना आता कापसाचे बियाणे विकत दिले नाही तर हे शेतकरी आजूबाजूच्या राज्यातून बियाणे खरेदी करतील. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी तेलंगणातून बियाणे खरेदी केले. त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. पुन्हा या शेतकऱ्यांवर तशी वेळ येऊ नये,  त्यासाठी सरकारने कापूस बियाणे विक्रीसाठी लवकर परवानगी द्यावी अशी मागणी वितरकांकडून केली जात आहे.


यवतमाळ जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात  साडे नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामाची लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यात पाच लाख हेक्टरवर कापसाचे लागवडीचे नियोजन आहे. यासाठी  24 लाख 30 हजार बॅग कापसाच्या लागणार असून त्याचे नियोजन करण्यात आले. शेतकऱ्याला बियांच्या बाबत कुठेही अडचणी निर्माण होणार नाही. मात्र बोण्ड अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले.


जिल्ह्यातील शेतकरी 15 मे नंतर बियाणे खरेदीला सुरुवात करतात. मात्र या वर्षी राज्य सरकारने अजब जीआर काढला. या जीआर नुसार कृषी विक्रेता 1 जून आधी शेतकऱ्यांना बियाणे विकू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बरेच शेतकरी बाजूच्या तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये जाऊन बियाणे विकत घेत आहे. परंतु हे बियाणे बोगस निघाले तर शेतकरी कोणाकडे तक्रार करणार असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले.