नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून, अज्ञात महिलेने व्यावसायिकाला 41 लाख रुपयांचा गंडा घातला. नाशिकमध्ये हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेचा शोध सुरु आहे.
ब्रिटिशमधील आमच्या कंपनीसाठी औषधी बियांची गरज असते, त्यामुळे त्या बिया खरेदी करुन आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला अधिकचे पैसे देऊ, असा सल्ला महिलेने व्यावसायिकाला दिला. बिया कुणाकडून खरेदी करुन कंपनीपर्यंत पोहोचवायच्या यासंदर्भात महिलेने व्यावसायिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्क घडवून दिला.
त्यानुसार व्यावसायिकाने जून 2017 पासून आजपर्यंत सबंधिताच्या बँक खात्यात 41 लाख 64 हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र अजूनही औषधी बिया मिळाल्या नाहीत. शिवाय, संबंधिताकडून प्रतिसादही मिळत नसल्याचे लक्षात आले.
अखेर व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.