पुणे : मतांच्या सौदागरांमुळे तिहेरी तलाकचं विधेयक संमत होण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे, अशा शब्दात भाजपचे खासदार गिरीराज सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


शरद पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत तिहेरी तलाकचं समर्थन केलं होतं. तिहेरी तलाक हा कुराणचा संदेश आहे, तो बदलण्याचा अधिकार राजकारण्यांना नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर भाजपचे खासदार गिरीराज सिंग यांनी शरद पवार यांना मतांचे सौदागर, असं म्हणत प्रतिहल्ला चढवला.

''जवळपास 22 मुस्लीम देशात तिहेरी तलाक प्रथा संपुष्टात आली आहे. भारतात मतांचे सौदागर तलाकच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठा अडथळा आहेत. लोकसभेप्रमाणे काँग्रेससह इतर पक्षांनी राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्यावा. अन्यथा त्यांची दुतोंडी भूमिका जगासमोर येईल,'' असं गिरीराज सिंग म्हणाले.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्यात केंद्र सरकारला यश आलं. मात्र हे विधेयक राज्यसभेत अडकलं आहे. लोकसभेत पाठिंबा दिलेल्या काँग्रेसनेही राज्यसभेत तिहेरी तलाकला विरोध केला.