जळगाव : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाच्या बाथरूममध्ये काल (बुधवारी) एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी यांना दोषी धरत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे विविध कारनामे समोर येत आहेत. त्यातील एक गंभीर प्रकार काल (बुधवारी) समोर आला होता. कोविड रुग्णलयातून आठ दिवस बेपत्ता असलेल्या मालती नेहेते या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह कोविड रुग्णालयातील बाथरूममध्ये आढळून आल्याने रुग्णालयातील सावळा गोंधळ पुढे आला होता. या घटनेची राज्यपातळीवर गंभीर दखल घेतली गेली असून या घटनेत उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी यांच्या विरोधात आता शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या संदर्भात रुग्णालयाचे विशेष वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत कळसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या तारखेला कामावर हजर असणाऱ्यांची नावं निष्पन्न करून त्यांच्या विरोधात आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
काय आहे हे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला प्रकृती गंभीर झाल्याने एक जून रोजी जळगावच्या शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. मात्र 24 तासानंतर ही महिला बेपत्ता झाल्याचं समोर आले होते. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना गेल्या आठवडाभरापासून महिला सापडत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी सदर महिला हरवल्याची नोंद शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपास सुरु असतानाच कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सात मधील बाथरुम मधून दुर्गंधी येत असल्याच समोर आलं होतं. या
घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दरवाजा तोडला असता सदर महिला मृत अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
पाहा व्हिडीओ : जळगावमध्ये आठ दिवस बेपत्ता कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडला
अतिशय निंदनीय बाब : मंत्री गुलाबराव पाटील
कोविड रुग्णलयातून महिला गायब झाल्याचं कळल्यावर महिला हरवल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासनाने आणि रुग्णालय प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांची मदत घेऊन बाथरुम मध्ये शोध घ्यायला पाहिजे होता. मात्र दुर्गंधी येईपर्यंत तो होऊ शकला नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या घटनेच्या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करत आहोत. या घटनेमुळे जनतेचा शासनाच्या रुग्णालयच्या विश्वासहर्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते. आमच्या सारख्या लोक प्रतिनिधीच्या दृष्टीनेही ही अतिशय निंदनीय बाब असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :