जळगाव : कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाच्या बाथरुममध्ये आढळून आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला दोन जून पासून बेपत्ता झालेली होती. या घटनेने जळगावच्या कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे


जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला प्रकृती गंभीर झाल्याने एक जून रोजी जळगावच्या शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. मात्र 24 तासानंतर मात्र ही महिला बेपत्ता झाल्याचं समोर आले होते. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना गेल्या आठवडाभरापासून महिला सापडत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी सदर महिला हरवल्याची नोंद शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपास सुरू असतानाच आज कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सात मधील बाथरुम मधून दुर्गंधी येत असल्याच समोर आलं होते.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दरवाजा तोडला असता सदर महिला मृत अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने मात्र कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आठ दिवसात या बाथरुमची स्वच्छता कोणी केली नाही का? महिला बेपत्ता असताना सीसीटिव्ही कॅमेराचा उपयोग का केला गेला नाही,सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असले तरी ते नेहमीच बंद का असतात, उपचार करणाऱ्या एखादया डॉक्टर ,सिस्टर वॉर्ड बॉय यांना कोणालाही बाथरुम मध्ये शोधण्यास का सूचल नाही का? या कालावधीत वॉर्डात कोणीच गेलं नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे.


या घटनेसंदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की, सदर घटना ही अतिशय गंभीर आहे. या घटनेची प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्यामध्ये जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे.


घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनीही ही कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली आहे. आठ दिवसापर्यंत आपल्या आजीचा तपास पोलीस यंत्रणेला आणि रुग्णालय प्रशासनाला लागत नाही यावरुन हे किती गांभीर्याने रुग्णाकडे पाहतात हे दिसून येत आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणीही आता नातेवाईक करीत आहेत.


कोविड रुग्णलयातून महिला गायब झाल्याचं कळल्यावर महिला हरवल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासनाने आणि रुग्णालय प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांची मदत घेऊन बाथरुम मध्ये शोध घ्यायला पाहिजे होता. मात्र दुर्गंधी येईपर्यंत तो होऊ शकला नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या घटनेच्या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करत आहोत. या घटनेमुळे जनतेचा शासनाच्या रुग्णालयच्या विश्वासहर्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते. आमच्या सारख्या लोक प्रतिनिधीच्या दृष्टीनेही ही अतिशय निंदनीय बाब असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.