मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांचे (Maharashtra State Association of Resident Doctors) वेतन वेळेत मिळत नसल्याने 10 तारखेच्या आत पगार तसेच विद्या वेतनमध्ये 10 हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, आदी आश्वासन सरकारकडून देण्यात आल्यानंतर संप माघार घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह ठराविक तारखेला नियमित विद्यावेतन, वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 


नवीन हॉस्टेलच्या संदर्भामध्ये संचालक, आयुक्त यांना निर्णय देण्यात आला आहे. नवीन होस्टेल आणि दुरुस्तीसाठी त्वरित 80 कोटी रुपये दिले आहेत, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर आम्ही 7 ते 10 दिवसांची वाट पाहू. मात्र, त्यानंतर जर सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका स्पष्ट करु, असा इशारा राज्यातील निवासी डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. 


संप मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, तसेच सेंट्रल मार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


मार्डच्या मागण्यांवर अजित पवार काय म्हणाले?


वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहांच्या तक्रारींसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी. शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर आज घेण्यात आलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.


इतर महत्वाच्या बातम्या