कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शड्डू ठोकला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे यांनी गेल्या पाच दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्यापासून चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, ते त्यांच्या गगनबावड्यातील फार्महाऊसवर असल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे निश्चित नाही
संभाजीराजे येत्या 11 तारखेला वाढदिनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे यांनी कोल्हापुरात निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मतदारसंघात दौरे सुरु करणार होते. मात्र, त्यांनी अचानक दौरे रद्द केल्यानंतर भूवया उंचावल्या होत्या. दुसरीकडे, संभाजीराजे कोल्हापूर लोकसभेसाठी तयारी केली असली, तरी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे निश्चित नाही. त्यांच्याकडे, महाविकास आघाडीकडून चाचपणी केली असली, तरी त्यांनी इतर कोणत्याही पक्षाचा विचार नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी संभाजीराजे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेसाठी कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा तिन्ही ठिकाणांहून लोकसभेसाठी चाचपणी सुरू केली असतानाच कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही
दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीकडून त्यांना काही अटींवर उमेदवारीची चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. कोल्हापूर लोकसभेला इच्छुक असतील तर त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करून मगच उमेदवारी घ्यावी, अशी अट घालण्यात आल्याचे समजते. या सर्व पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आता खुलासा केला होता. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माजी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला असा दावा करण्यात आला असला तरी सद्यस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसशी बोलणी केल्याचे समजते. राजे उमेदवारीचा विचार करताना काँग्रेसचा पर्याय निवडणार का? अशी चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा असेल असे म्हटले होते. त्यानंतर अचानक संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवतात की स्वराजला महाविकास आघाडीचा घटक पक्ष करून उमेदवारी मिळवतात? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या