Winter Assembly Session : उद्यापासून (19 डिसेंबर) नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. दुसरीकडे आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणं बहिष्कार घातला आहे. आज दुपारी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर केलं. यावेळी अजित पवार म्हणाले की, हे अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत, असं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, आम्हाला चहापणाला उपस्थित रहा असं सांगितलं, मात्र 6 महिने सरकारं सत्तेवर आलं आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजू देखील मांडू शकले नाहीत, असंही ते म्हणाले.  


अजित पवार म्हणाले की,  ज्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्या मिळतात त्याचे पैसे देखील वेळेवर जात नाही. अनेक संस्थांचे पैसे थकले आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ कोकणला देखील मदत मिळाली पाहिजे. कर्ज काढण्याला विरोध नाही मात्र त्यातून सर्वांना न्याय मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे.  विदर्भाचा अनुशेष अजुनही पुरेसा नाही. धान खरेदी तोंड बघून केली जाते, असा आरोपही त्यंनी केला. 


अजित पवार म्हणाले की, राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता.  त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी 7 कोटी निधी करावा आहे का हिंमत बघुयात. असं अजित पवार म्हणाले. 


भाजपने ट्वीट केलेला पैसे वाटपाचा व्हिडीओ खोटा


भाजपने ट्वीट केलेला पैसे वाटपाचा व्हिडीओ हा खोटा आहे. ज्यांनी ट्वीट केला आहे तेच यामागे असल्याचं उघड होईल. जे व्हिडीओमध्ये दिसत आहेत त्यांना तुम्ही भेटा आणि विचारा, मग सत्य समोर येईल, असं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की,  उद्धव ठाकरे या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. उद्या आमची 4 वाजता बैठक होईल आणि त्या बैठकीला उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित राहतील,


विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच या अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.