INS Mormugao: आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही 15 बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात (Indian Navy) दाखल झाली आहे. आज या युद्धनौकेच कमिशनिंग (INS Mormugao Commission) झालं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ((INS Mormugao)) ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.
आयएनएस विशाखापट्टणम नंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोरमुगाओ ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे. मुंबईत माझगाव डॉकमध्ये ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील 4 नौकांची निर्मिती करण्याची घोषणा 2011 मध्ये करण्यात आली होती. यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.
भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकवण्यात आला. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, युद्धनौका आपली ताकद आहे. युद्धनौका तयार करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे कौतुक असून आम्ही त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला
छ्त्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा इतिहास आहे. अशा या राज्यात मोरमुगाओ सेवेत दाखल होत आहे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.
'मोरमुगाओ' या नावामागे गोवा मुक्ती संघर्षाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले. नौदलाच्या माध्यमातून गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला दिलेली ही मानवंदना असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 'मेकिंग इंडिया' अंतर्गत आपण फक्त भारतासाठी नाही तर पुढे जगासाठी आपण युद्ध नौका बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयएनएस मोरमुगाओची वैशिष्ट्य काय आहेत ?
आयएनएस मोरमुगाओ ही आयएनएस विशाखापट्टणम सारखीच ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र (मिसाईल), दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल वॉरफेअर सिस्टिम (युद्धप्रणाली), स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडारने सुसज्ज आहे. त्याशिवाय, आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रांचा मारा या युद्धनौकेवरून करता येऊ शकतो. त्याशिवाय, हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणादेखील आहे.
या नौकेतील 76 टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. 'शौर्य, पराक्रम व विजयी भव' ही आयएनएस मोरमुगाओची युद्धघोषणा आहे. ‘डी ६७’ हा या नौकेचा क्रमांक आहे. 'प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज' असे आयएनएस मोरमुगाओचे ब्रीदवाक्य आहे.
मोरमुगाओ या नावाचा इतिहास
मोरमुगाओ नावाचे शहर गोव्यात समुद्रकिनारी आहे. या शहराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. पण शहराचे मूळ नाव मोरमुगाओ आहे. मोरमुगाओ हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मोरमुगाओ हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात आली आहे.