मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून 2021 सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्याचं चित्र आहे. त्यातच 'ब्रेक द चेन' अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन 1 जूनला संपणार, वाढणार की निर्बंध हळूहळू शिथील होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. 


तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधून काहीशी सूट मिळेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


मुख्यमंत्री काय म्हणाले?
लॉकडाऊनबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयाला चारच दिवस झाले आहेत. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे परिणाम काय होतात हे पाहून पुढील निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती पाहता लवकरच आढावा बैठक होईल. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर संचारबंदीमध्ये सूट देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल." 


"मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांमध्ये घट झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आवश्यक आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले. 


राज्यात लॉकडाऊन वाढणार की टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करणार? शिवभोजन थाळी 14 जूनपर्यंत मोफत


मुंबईचे महापालिका आयुक्तांकडून सूट मिळण्याचे संकेत
तर कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबईतील बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात कमी झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जून महिन्यात निर्बंधांमधून सूट मिळण्याचे संकेत दिले आहेत. बीएमसी आयुक्त म्हणाले की, "मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर चार टक्क्यांवर आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार आहोत. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने काही व्यवहार सुरु होऊ शकतील. यामध्ये सम-विषय पद्धतीने दुकानं सुरु ठेवणे याचा समावेश असेल. तसंच कार्यालयाच्या उपस्थितीवर फेरविचार होऊ शकतो. मात्र लोकल ट्रेन पहिल्या टप्प्यात सुरु होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही."


14 जून 2021 पर्यंत मोफत शिवभोजन थाळी
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी 'ब्रेक द चेन' प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत मोफत थाळी दिली जात आहे. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून 14 जून 2021 पर्यंत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय जारी केला आहे. आतापर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
 
राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यानंतर सुरुवातीला 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत कडक निर्बंध जारी केले होते.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे हे निर्बंध 15 मेपर्यंत वाढवण्यात आले. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार राज्यात 1 जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू आहेत. यापूर्वी लागू असलेले निर्बंध कायम असून काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे.