गडचिरोली : उत्तर गडचिरोलीमध्ये गुरुवारी रात्री आणि शुक्रवारच्या सुमारास झालेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये गडचिरोली पोलिसांच्या पथकातील सी-60 तुकडीला मोठं यश मिळालं. तेंदू पत्ता संकलनासाठीच्या बैठकीचं आयोजन नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सीमेनजीकच्या एका गावापाशी केलं होतं. याबातची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकानं ही कारवाई केली. याची माहिती पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिली. पोलिसांनी केलेल्या या धडाडीच्या कारवाईमध्ये तब्बल 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 


ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या 13 दहशतवाद्यांवर एकत्रितपणे तब्बल 60 लाख रुपयांचं बक्षीस शासनातर्फे जाहीर करण्यात आलं होतं. 


'पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सी 60 जवानांचं पथक रवाना करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी ऑपरेशन सुरु केल्यानंतर तिथे लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी लगेचच सावध होत गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही या गोळीबाराचं प्रत्युत्तर दिलं. जवळपास तासभर गोळीबार चालला आणि ज्यानंतर इथे शोधमोहिम हाती घेतली असता पोलिसांना या चकमकीत मारल्या 13 नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले', अशी माहिती गोयल यांनी दिली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही मिळाला. यामध्ये एके 45, 5 एसएलआर, टर्बाईन आणि इतरही शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.  



उत्तर गडचिरोली भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत होतं, ज्याचा कमांडरही मारला गेल्यामुळे आता या दलमचं कंबरडं मोडलं गेलं आहे. पोलीस पथकाच्या या कारवाईला मोठं यश मिळाल्यानंतर पोलीस दलातील बँड पथकाकडून सी-60 जवानांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं.



 


गडचिरोलीत 13 नक्षल्यांना कंठस्नान, गृहमंत्री वळसे पाटलांचा गडचिरोली दौरा, पोलिसांचं केलं कौतुक


सध्याचा काळ हा तेंदूपत्ता संकलनाचा.... 


सध्याचा काळ हा तेंदू पत्ता संकलनाचा काळ आहे. या संपूर्ण भागाची अर्थव्यवस्था तेंदू पत्ता संकलनावर अवलंबून आहे. त्यामुळं याला नेमकी किंमत द्यायची याकडे शासनाचा भाग असला तरीही सत्यपरिस्थिती हीच आहे कि नक्षलवादीच या किमती ठरवतात. याच किंमती ठरवण्यासाठीची बैठक नक्षलवाद्यांनी एका गावात बोलावली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी आखणी करत बैठक सुरु असताना दबा धरून बसून, त्यांनी ही कारवाई केली.