मुंबई :  राज्यात कोरोनाचे आकडे कमी होत असताना आता राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत लॉकडाऊन वाढणार की टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिल पासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत  मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक 14 जून 2021 पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने  यासंबंधी चा शासननिर्णय 14 मे 2021 रोजी  निर्गमित केला आहे.

Continues below advertisement


ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत  या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे. 


48 लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क भोजनाचा लाभ
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात  राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे.  राज्यात दिनांक 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. 15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात  मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.


योजनेत आतापर्यंत 4 कोटींहून अधिक थाळ्यांचे वितरण
योजना सुरु झाल्यापासून  आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 36 थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे.  संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरु आहेत.