मुंबई : राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्यता आहे.


भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही.राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल तर त्याचा फायदाच होईल असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच येत्या दहाबारा दिवसात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होत आहे. त्यातही महाविकास आघाडी एकत्र येणार आहे.

Maha Vikas Aghadi | मुंबई मनपात महाविकास आघाडीच्या प्रयोगाचे संकेत | नागपूर | ABP Majha



पाच महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नव्या वर्षात होणार आहे. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर या 5 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नव्या वर्षात 2020 मध्ये होणार आहेत. नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल ते मे 2020 या कालावधीत होणार आहेत. तर वसई-विरार महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक जून -2020 होणार आहे. कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या 2 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर - 2020 या कालावधीत होणार आहेत.

राज्याच्या राजकीय दृष्टीने 2019 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून गाजले आहे. लोकसभा पाठोपाठ सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता आगामी वर्षात 5 खासदार तर 29 आमदारांच्या पदांसाठी होणार निवडणुका होणार आहेत. तर राज्यात नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम असणार आहे. यामध्ये 5 महापालिका, 81 नगरपरिषद, नगरपंचायती व 8 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि 2020 नव्या वर्षात राज्यभरातील 14376 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत.