कोल्हापूर : पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सोमवारी गोळी लागून वीरमरण आलेले महागाव (ता. गडहिंग्लज) येथील जवान जोतिबा गणपती चौगुले यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी उपस्थित प्रत्येक माणसाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. मात्र यावेळी एका दृश्याने मात्र इथं उपस्थित प्रत्येकाला हुंदका आणला. शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर जिल्ह्यातील उंबरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अवघ्या आठ वर्षांचा असलेला त्यांचा मुलगा अथर्वने आपल्या पित्याला अग्नि दिल्यानंतर कडक सॅल्युट मारुन मानवंदना दिली. हे दृश्य पाहून अनेकांना हुंदका अनावर झाला.


शहीद जवान जोतीबा चौगुले यांचे पार्थिव आज 7.30 वाजता हरळी येथे पोहचले. या ठिकाणाहून लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ, विद्यार्थी - विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. 'अमर रहे अमर रहे जोतिबा चौगुले अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा महागाव येथे पोहचली. येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॕक्टरमधून ही अंत्ययात्रा उंबरवाडी येथील निवासस्थानी आली. या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. वडील गणपती चौगुले, आई वत्सला, पत्नी यशोदा आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान जोतीबा चौगुले यांचा मुलगा अथर्व याच्या हस्ते अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अथर्वने आपल्या पित्याला कडक सॅल्यूट करत अभिवादन केले. हे काळीज चिरणारं दृश्य पाहून अनेकांना हुंदका अनावर झाला.

जोतिबा गणपती चौगुले यांना अभिवादन करण्यासाठी हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव या गावचे. 2009 साली चौगले सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथं अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत चौगले यांना वीरमरण आले. शहीद चौगुले यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. महागाव आणि उंबरवाडीमध्ये दोन्ही गावांमध्ये दुखवटा म्हणून सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले होते. यावेळी जोतिबा चौगुले यांच्या नातेवाईकांसह त्यांचे मित्र त्यांच्या आठवणीत शोकाकूल झाले होते.