मुंबई: शेतकरी कर्जमाफीसाठी या अधिवेशनात 20 हजार कोटींची तरतूद करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कर्जमाफीवरुन सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घेण्याची गरज काय? सरकारनं आधीच यादी जाहीर केली आहे. मग अर्ज कशाला?  असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. याच विषयावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला ही माहिती दिली.

दरम्यान, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षाला चहापानासाठी निमंत्रित केलं होतं. मात्र, विरोधीपक्षांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन चहापानावर बहिष्कार टाकला.

या अधिवेशना 14 विधेयक प्रस्तावित असून परिषदेत 7 प्रलंबित विधेयकं आहेत. एकूण 21 विधेयकं या अधिवेशनात असतील, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.