मुंबई : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी तत्काळ मदत म्हणून 10 हजार रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली. या मदतीचा फायदा राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र केवळ 3200 शेतकऱ्यांनाच ही तातडीची मदत मिळाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी याबाबतची माहिती उघड केली आहे.

महाराष्ट्रातील 90 टक्के शेतकरी पेरणीचा खर्च करण्यासाठी अल्पकालीन पीककर्ज घेतात. त्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा होऊनही बँकांकडूनही नवीन पतपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 10 हजारांची तातडीची मदत 14 जूनला जाहीर केली. यावेळी राज्य सरकारने बँकांना आपली हमी तत्काळ जारी केली होती.

पण तातडीच्या मदत वाटपाचा आदेश बँकांनी 15 जुलैपर्यंत संबंधित शाखांना दिले नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उद्भवलेल्या या परिस्थितीला जबाबदार असलेल्या सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वसंतराव  तिवारी यांनी केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी यंदाच्या खरीप हंगामात फक्त 15 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे . पण विदर्भ, मराठवाडामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सहा टक्केच पीककर्ज वाटप झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. उलट दिवाळखोरीच्या मार्गावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी (डीसीसीबी) आर्थिक स्थिती खराब असताना सुद्धा 50 टक्क्यांपेक्षा अधिक पीककर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण केल्याचे तिवारी यांनी सांगितले.