जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संस्थेने बळकावलेली आदर्श शाळेची इमारत अखेर परत केली आहे. 'एबीपी माझा'नं यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर दानवेंच्या संस्थेनं शाळेवरचा ताबा सोडला आहे.

सरकारच्या कुठल्याही परवानगीशिवाय आदर्श शाळेवर दानवेंच्या संस्थेनं कब्जा मिळवला होता. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील जोमाळा गावात ही शाळेची इमारत आहे. अगदी नाममात्र भाडेतत्वावर ही इमारत रावसाहेब दानवेंना मिळाल्याचा आरोप होता.

काय आहे प्रकरण?

जयराम रमेश ग्रामविकास मंत्री असताना देशात 100 मॉडेल स्कूल करण्याचं उद्दिष्ट होतं. मनमोहन सरकार जाऊन मोदी सरकार आल्यावर मॉडेल स्कूलचा प्रस्ताव मागे पडला. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती राज्य सरकारने पूर्ण केल्या.

रावसाहेब दानवेंवर शाळेची इमारत बळकावल्याचा आरोप

जवळपास चार हजार स्क्वेअर फुटांची जागा आणि 25 खोल्या असलेली जोमाळ्यातील शाळेची इमारत रावसाहेब दानवेंच्या संस्थेला भाड्याने मिळाली. रावसाहेब दानवे हे मोरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आहेत.

दानवेंच्या संस्थेला इमारतीचा ताबा मिळताच 'मराठवाडा रेसिडेंशीअल स्कूल, भोकरदन' या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली.