पुणे: पुण्यात सध्या आयटी इंजिनिअरच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. आज एकाच दिवशी दोन  इंजिनिअर्सनी आत्महत्या केल्या.


निनाद पाटील या इंजिनिअरने पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमधील वर्धमान सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून, आयुष्य संपवलं. निनाद इन्फोसिस कंपनीत काम करत होता.

त्याशिवाय पुण्याच्या कोंढव्यात बंगळुरूहून भेटायला आलेल्या महिला अभियंतेने प्रियकराने भेट न दिल्याने, इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

यापूर्वी इंजिनिअर्सच्या आत्महत्या

2 एप्रिल 2017 - जीशन शेख, पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या या अभियंत्याने 11व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.
17 मार्च 2017 - दिघी येथील राजू तिवारी या अभियंत्याने पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली.
3 फेब्रुवारी 2017 - अभिषेक यादव, हिंजवडीतील या अभियंत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

अभियंत्यांच्या एकापाठोपाठ होणाऱ्या या आत्महत्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजवत आहेत. आत्महत्यांमागे कंपनीतील ताण-तणाव, नैराश्य, धकाधकीची जीवनशैली आणि व्यसनाधीनता याला कारणीभूत ठरत आहे.

2000 साली भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने धूम माजवायला सुरुवात केली. या क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अगदी काही वर्षाचा अनुभव कर्मचाऱ्यांना सहा आकड्यांच्या घरात पगारा मिळवून देऊ लागला. यामुळं बांधकाम व्यवसायदेखील तेजीत चालू लागला. परिणामी अर्थ व्यवस्थेला मोठी गती मिळाली.

एकीकडं अर्थव्यवस्थेला ही गती मिळत असताना यात अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. याची सुरुवात 2009 च्या आर्थिक मंदीपासून सुरु झाली, ती आजही या ना त्या कारणाने प्रकर्षाने दिसून येते.

केवळ महाराष्ट्राचाच विचार केला तर प्रत्येक वर्षी इंजिनिअरिंगचे दीड लाख विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. सध्याची परिस्थिती पाहता 50 हजार हून अधिक जागा या रिक्त आहेत. तर जे शिक्षण घेऊन नोकऱ्या करत आहेत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. त्याला भारतातील कंपन्यांची धोरणं जशी कारणीभूत आहेत तशीच परदेशात घडणाऱ्या घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत.

भारतातील ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. कंपन्यांच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारे ताणतणाव आणि नैराश्य यातून या घटना घडत आहेत. ही परिस्थिती निवळायची असेल तर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणं गरजेचं आहे.