शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपावर घणाघाती टीका केली.
शिवसेनेनं उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी १९ मे रोजी नाशिकमध्ये शेतकरी अधिवेशन आयोजित केलं आहे.
या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी विनायकदादा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहे.
"सत्तेत असलो तरी आम्ही सध्या देणाऱ्यांच्या नव्हे तर मागणाऱ्यांच्या भूमिकेत आहोत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उध्दव ठाकरेंच्या नेत्वृत्वाखाली पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना विधानसभेवर निर्धार मोर्चा काढणार असून कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई लढणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.
समृध्दी महामार्गाच्या नावाखाली सरकारला शेतकऱ्यांची थडगी आम्ही बांधू देणार नाही असं म्हणत सेनेनं समृध्दी महामार्गाच्या विरोधातही एल्गार पुकारला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रस्तावित संपात उभी फूट, एका गटाची माघार
शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या संपामध्ये उभी फूट पडल्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर एका गटाने संपातून माघार घेतली आहे. तर दुसरा गट मात्र संपावर ठाम आहे.
पुणतांबा गावातील एका गटाने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजकीय नेते आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांचा नियोजित संप होणार असल्याचं किसान क्रांती संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 3 एप्रिल रोजी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटले.