औरंगाबाद: इंजिनिअरिंगचा झालेला पेपर दुसऱ्या दिवशी एका घरात सोडवणाऱ्या 27 विद्यार्थ्यांनंतर ,आता शिवसेना नगरसेवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सीताराम सुरे असं या शिवसेना नगरसेवकाचं नाव आहे.
तसंच याप्रकरणी 'बामू' विद्यापीठाने साई महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग परिक्षेचं केंद्र तात्काळ रद्द केलं आहे. इतकंच नाही तर वेळ पडल्यास त्या महाविद्यालयात पूर्वी झालेले सर्व विषयांचे पेपर रद्द करु, असाही इशारा परीक्षा विभागप्रमुख डॉ. दिगंबर नेटके यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांचे पेपर काल होते. साई महाविद्यालयात हे परीक्षा केंद्र होतं. मात्र काल पेपर दिल्यानंतरही तेच पेपर आज शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात काही विद्यार्थी सोडवत असल्याची माहिती औरंगाबादच्या क्राईम ब्रांचला मिळाली. एक-दोन नव्हे तर तब्बल 27 जण झालेला पेपर पुन्हा सोडवत होते.
क्राईम ब्रांचनं छापा टाकला आणि त्या कारवाईत 27 मुलांना ताब्यात घेतलं. हे सर्व विद्यार्थी चौका गावातल्या कॉलेजचे असल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान हे पेपर या विद्यार्थ्यांकडे कसे आले, शिवसेना नगरसेवकांचा यात काय हात आहे..याचा तपास पोलीस करत आहेत.