अहमदनगर : यंदाचं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर आणि रंगनाथ पठारे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रंगनाथ पठारे यांनी नेमाडे यांच्यां नावाचा आग्रह धरला आहे. संयोजन समितीने नेमाडे यांना भेटले पाहिजे, त्यांच्या अटीसह त्यांचा नावाचा विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले, तर मला अध्यक्षपदात रस नाही. कोणीही झाला तरी हरकत नाही. पण, अध्यक्षाची निवड पारदर्शी झाली पाहिजे, चांगला माणूस अध्यक्ष झाला पाहीजे, अशी अपेक्षा महानोर यांनी व्यक्त केली आहे.
साहित्यिक रंगनाथ पठारे
अध्यक्षपदाबाबत मी वेळोवेळी प्रतिक्रिया दिलीय आणि यातील सगळं पाहून मी बाजूला राहिलोय. आता निवडणुका संपविल्या ही चांगली गोष्ट आहे. पण, सामान्य वाचक ज्या श्रद्धेने संमेलनाला जातो त्याचा सन्मान केला पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे आज आहेत. संयोजन समितीने त्यांना भेटले पाहिजे, त्यांच्या नावाचा विचार त्यांच्या अटींसह केला पाहिजे, असं मला वाटत.
आधी निवडणूक पद्धत होती आणि यात पडायचं नाही, असं नेमाडेंसह त्याकाळच्या सर्वांचं मत होतं. ते कधी संमेलनाकडे का फिरकले नाही याचा विचार साहित्य संस्कृतीने केला पाहिजे. आतापर्यंत अध्यक्षपद मिळालेल्या व्यक्तींची अनेकदा अप्रतिष्ठा केली गेली. मग नेमाडे यांच्यासारख्या व्यक्तींनी हा विचार का करावा हे महत्त्वाचं.
मराठी वाचक हा महत्वाचा असून त्याच्या विषयी मला आदर आहे. पंढरपूरच्या वारीला वारकरी अवघ्या राज्यातून चालत येतात व उत्सव साजरा करतात. त्याच श्रद्धेने संमेलनाला वाचक येतो. त्याला कोणी टीए डीए देत नाही आणि त्याच्या श्रद्धेचा मान राखायचा असेल तर समितीने काहीतरी केले पाहिजे. अनेक लेखक आज आहेत. मात्र, अध्यक्ष करायचे असेल तर नेमाडे यांना केलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यंदाचं अभा मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये; कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा, दिल्लीची संधी हुकली
ना. धो. महानोर
साहित्याची सेवा करताना आपल्याला अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात मी पूर्णपणे समाधानी आहे, त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक नाही. या संदर्भात आपण समितीला अगोदर कळवलेले आहे, कोणीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमले गेले तर त्यात मी स्वतःला पाहत असतो. ज्याची निवड होईल त्याचा आपल्याला आनंद असेल, असं ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांनी म्हटलं आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षासाठी कोणत्याही स्वरुपाचं भौगोलिक कुंपण नसतं आणि नसावं. सर्वानुमते त्याची निवड केली जाते. मी आणि भालचंद्र नेमाडे यांनी पूर्वीपासूनच आमचा अध्यक्ष पदासाठी नकार काळवलेला असल्याने ज्यांनी नकार कळविला आहे, त्यांची नावे सोडून आलेल्या नावाचा विचार केला जातो. तो तसाच केला गेला पाहिजे, हे काम नीटपणाने आणि पारदर्शीपणे व्हावी, अशी माझी ईच्छा असल्याचं महानोर यांनी म्हटलं आहे.