मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणाऱ्या भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. 9 जानेवारी रोजी रुग्णालयात नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका डॉक्टरसह तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल काल रात्री उशीरा आला. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असं टोपेंनी सांगितलं.
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, कुणावर काय कारवाई
डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन - निलंबित
डॉ. सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन- बदली
अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी- निलंबित
सुशील अंबडे, बालरोग तज्ञ - सेवा समाप्त
ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज - निलंबित
स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स - सेवा समाप्त
शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स - सेवा समाप्त
अहवालात नेमकं काय सांगितलं
अहवालात सांगण्यात आलं आहे की, रात्री एक ते दीड दरम्यान बेबी वार्मर कंट्रोल पॅनलमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली. या ठिकाणी प्लास्टिक मटेरियल होतं. तसेच कॉटन गाद्या,वायर्स होत्या. बेबी वार्मरला आग लागली, त्यावेळी काही बाळं ऑक्सिजन वर होती. आग वाढली आणि ती रूम बंद असल्याने आणि प्लास्टिक मटेरियल असल्याने आग विझल्यावर धूर पसरला. फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार या घटनेतील तीन बाळांचा आगीमुळे मृत्यू झाला तर 7 बालकं धुरामुळे गुदमरून मरण पावली.
भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू
टोपेंनी सांगितलं की, या घटनेत जी बिल्डिंग बंधण्यात आली ती 2015 साली पूर्ण झाली. ह्यात national health mission मधून 2 कोटी निधी दिला होता.सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं. 2016 साली याचं उद्घाटन झालं. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने आगीचे ऑडिट तपासण्याची आवश्यकता होती ते झालं नाही. घाईगडबडीने उद्घाटन झालं, असं त्यांनी सांगितलं.
प्रमुख तीन कारणं
- 2016 मध्ये हॉस्पिटल इमारत हस्तांतरित करताना आवश्यक NOC दिली नव्हती.
- तांत्रिक मान्यता फायर ऑडिट प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोव्हेंबरपासून पडून आहे
- तेथील डॉक्टर, नर्स स्टाफ कर्तव्यात कसूर
काय आहे प्रकरण?
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) 9 जानेवारी रोजी आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं. या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील होती. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.